शनिवार, 24 अप्रैल 2010

संत महिपती' जीवन कार्यावर मराठी चित्रपट

 संत कवी महिपती महाराजांच्या जीवनावर आधारित "संत महिपती' या चित्रपटाचे चित्रीकरण सत्तर टक्के पूर्ण झाले असून, या चित्रपटामध्ये वारकऱ्यांच्या भूमिकेत काम करण्याची संधी भक्तगणांना मिळत असल्यामुळे ते हरखून गेले आहेत.
संतकवी महिपतीमहाराज यांच्या जीवनावर आधारित आनंदसागर डिजीटल क्रिएशन संस्था चित्रपटाची निर्मिती करीत आहे. रविवारी (दि. १७) सकाळी १० वाजता ताहराबाद येथे चित्रीकरणास प्रारंभ होत आहे, अशी माहिती महिपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी दिली.
ज्ञानेश्वर माने निर्माते असून, दिग्दर्शक दत्तात्रय तारडे, कलादिग्दर्शक सुनील भोंगळ, संगीतकार अतुल देव, गायक मनोहर इनामदार आहेत. लेखन मोहमंद अनिल यांनी केले असून, बलीकाका यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. नगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील ४० कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे.
महिपतीमहाराजांची भूमिका प्रा. शिरीष गुणे करणार आहेत. प्रकाश धोत्रे, वृंदा बाळ, मंजिरी भुजबळ यांच्या प्रमुख भूमिका असतील. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांच्या हस्ते चित्रीकरणाचा प्रारंभ करण्यात येईल.
महिपतीमहाराजांचे परमार्थिक कार्य, ग्रंथलेखन, चरित्र आदींवर हा चित्रपट आधारित आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा इतिहास चित्रीत करण्याचे आव्हान निर्माते माने यांनी स्वीकारले आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून महिपती महाराज देवस्थान प्रसिद्धीच्या झोतात येणार आहे. छायाचित्रकार ज्ञानेश्‍वर माने यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त होऊन महाराजांचा जीवनपट सामान्य भाविकांपर्यंत पोचविण्याचे काम या चित्रपटातून होणार आहे.

हा चित्रपट बनविण्यासाठी साधारणपणे 25 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. सध्या पळशी (ता. पारनेर) या संत महिपती महाराजांचे आजोळ असलेल्या गावी हे चित्रीकरण सुरू असून, अडीचशे वर्षांपूर्वीचे प्रसंग प्रेक्षकांसमोर उभे करावयाचे असल्याने, तेथील प्राचीन मंदिर व पळशीकर वाड्यात चित्रीकरण सुरू आहे.

दिंड्या, सेवेकरी, गावकरी आदी भूमिका साकारण्यासाठी राहुरी तालुक्‍यातून अनेक जण जात आहेत. या चित्रपटात महिपतींची मुख्य भूमिका मुख्याध्यापक शिरीष गुणे हे साकारत असून, त्यांच्या पत्नीची- सरस्वतीबाईंची भूमिका डॉ. मंजिरी भुजबळ करीत आहेत. राहुरीच्या नाट्य सेवा कला ग्रुपचे हे कलाकार विनामूल्य योगदान देत आहेत. 
(सौजन्य - दै.सकाळ
सकाळ वृत्तसेवा )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें