बुधवार, 10 मार्च 2010

संत तुकारामांचा महिपतींना आशीर्वाद

तुकोबांचा स्वप्नदृष्टांत
अशा प्रकारे पांडुरंगाची निस्सीम सेवा करीत असताना त्यांना एके दिवशी रात्री प्रत्यक्ष तुकोबांनी स्वप्नात दृष्टांत दिला. आपला वरदहस्त बोवांच्या मस्तकावर ठेवून ते म्हणाले, 'बोवा, नामदेवांच्या शतकोटी अभंगांचा संकल्प पांडुरंगाच्या कृपेने माझ्या हातून पूर्ण झाला आता संत चरित्राचे कार्य तुमच्या हातुन व्हावे.'
एवढे सांगून तुकोबा स्वप्नात अंतर्धान पावले आणि त्याच दिवसापासून बोवांना सुंदर काव्य स्फुरू लागले आणि बोवा तुकोबांनाच आपले परमार्थ गुरु मानु लागले.
या संदर्भात त्यांच्या ग्रंथातुन अनेक ओव्या आढळून येतात. उदारणार्थ -
जो भक्तिज्ञान वैराग्य पुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।
तो सद्गुरु तुकाराम आम्हासी जोडला । स्वप्नीं दिधला उपदेश ॥
किंवा
बाळपणी मरे माता । मग प्रतिपाळी पिता ॥१॥
तैशापरी सांभाळिले । ब्रीद आपुलें साच केलें ॥२॥
यात्रा नेली पंढरीसी । ध्यान ठेविलें पायांसी ॥३॥
हृदयीं प्रकटोनी बुध्दि । भक्तविजय नेला सिध्दी ॥४॥
स्वप्नीं येऊनि तुकाराम । आपुलें सांगितले नाम ॥५॥ इ.
महिपतीबोवांचे समकालीन कविश्रेष्ठ मोरोपंत यांनीही आपल्या 'महिपती स्तुती' मध्ये पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आढळते-
'सत्य तुकारामाचा, या महिपतिवरि वरप्रसाद असे ।
सद् नुग्रहाविणॆं हें निघतिल उद् गार सार काय असे ॥'
असो. बोवांचा जन्म झाला त्यावेळी श्रीतुकाराम महाराजांचे महानिर्वाण होऊन अर्धशतकाचा काळ लोटला होता. याचाच अर्थ, बोवांना संत तुकाराममहाराजांचा उपदेश होणे शक्य नव्हते. परंतु महिपतबोवांकडून प्रत्यक्ष पांडुरंगालाच भक्त चरित्र लेखनाचे महत्कार्य करवून घ्यावयाचे होते नि म्हणूनच भगवंतानेच ही लीला रचिली होती असेच म्हटले पाहिजे !
तथापि एवढी मोठी कृपा होऊनही बोवा मुळातच अतिशय नम्र असल्यामुळे या घटनेविषयी आपल्या 'भक्तलीलामृत' ग्रंथात ते लिहितात-
'मी तरी सर्वांविषयी हीन । ऎसे साक्ष देतसे मन ।
परी कृपा केली कवण्यागुणे । त्याचे कारण तो जाणे' ॥१-२१
संताचीच चरित्रे का लिहिली ?
बोवांनी आपल्या ग्रंथातून संतांचीच चरित्रे प्रामुख्याने का लिहिली याचे आणखी एक कारण म्हणजे बोवा स्वतः महान ईश्वरभक्त होते आणि संतांविषयी त्यांच्या मनात अपार भक्तिभाव होता. संत ही प्रत्यक्ष ईश्वराचीच चालती बोलती 'रूपडी' आहेत असें ते समजत.
ते एके ठिकाणी म्हणतात-
तुम्ही संतमूर्ती । ऎसा निश्चय दृढ चित्तीं ।
म्हणोनिया महिपती । नमन करी सद्भावे ॥
संतांविषयी हाच आदरभाव बाळगून त्या काळाच्या बहुतेक कवींनी आपल्या काव्यातून संत चरित्रांचे गायन केले आहे. कारण त्या काळात काव्य हे उपजीविकेचे साधन नव्हते तर श्रीहरीशी व संतांशी नाते जोडण्याचा तो एक उत्तम मार्ग होता !
माउलींनी देखील भावार्थ दीपिकेच्या अठराव्या अध्यायात असेच म्हटले आहे की-
हारपले आपण पावे । ते संताते पाहता गिवसावे ।
म्हणोनि वानावे ऎकावे । तेचि सदा ॥ (ज्ञाने. १८ । ३९ ३९७)
बोवांनी यासाठीच आपल्या चाळीस हजाराहून अधिक ओव्यात महाराष्ट्रातील १६८ व महाराष्ट्राबाहेरील ११६ संत पुरुषांची चरित्रे लिहून एक अभूतपूर्व विक्रमच जणू केला आहे ! बोवांचा हा प्रचण्ड व्याप पाहून त्यांच्या समोर आपले मस्तक आदराने लवल्याशिवाय राहत नाही !

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें