बुधवार, 10 मार्च 2010

संत महिपति परिचय

संत महिपति परिचय भक्तिभावाने ओथंबलेल्या सुमारे चाळीस हजार ओव्या लिहुन 'संत चरित्रकार' कविवर्य महिपतिबोवा ताहराबादकर यांनी मराठी भाषेत खरोखरच एक अमोल कामगिरी केली आहे. त्यांचे 'श्रीभक्तविजय' 'श्रीसंतलीलामृत' 'श्रीभक्तलीलामृत' यासारखे रसाळ ग्रंथ मराठी भाषेचे अमोल लेणे ठरले आहेत. आपल्या काव्य गंगेने त्यांनी लक्षावधी मराठी वाचकांना खरोखरच पावन करून टाकले आहे !
महिपती बोवांचा जन्म इ. स. १७१५ (शके १६३७) मधला. मोगलाईतील ताहराबाद हे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे संपूर्ण नाव महिपती दादोपंत कांबळे. हे ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राह्मण.
त्यांचे वडिल दादोपंत हे ताहराबाद येथे स्नानसंध्या, देवतार्चन आणि ध्यानधारणा करून मोठ्या आनंदाने कालक्रमण करीत असत. पंढरीचा पांडुरंग हेच सर्वस्व मानून त्यांनी तनमनधनाने त्याचीच उपासना केली. दर महिन्याच्या शुध्द एकादशीची त्यांची पंढरपुरची वारी चोवीस वर्षात कधी चुकली नाही.
परंतु पुढे वयाची साठ वर्षे झाली. शरीरयंत्र थकुन गेले. त्यामुळे दर शुध्द एकादशीला पंढरीस जाऊन पांडुरंगाच्या सावळ्या, गोजिर्‍या मूर्तीचे दर्शन घेणें त्यांना अवघड वाटु लागले.
तरीही एकदा ते पंढरीस गेले. शरीरास थकवा जाणवतच होता. लाडक्या पांडुरंगाची साजिरी मूर्ती डोळ्यात साठवून घेऊन ते भरल्या डोळ्यांनी म्हणाले, ' हे देवाधिदेवा, कदाचित् ..... हेच तुझे अखेरचे दर्श्न असेल. विठ्ठला मायबापाऽ आता शरीर साथ देत नाही. इतक्या दुर तुझ्या दर्शनासाठी आता नाही रे येववत ! सावळ्या पांडुरंगा, मनीमानसी एकच इच्छा होती ..... ही पंढरीची वारी पुढच्याही पिढीत अशीच चालू रहावी. परंतु ..... माझ्या सारख्या निपुत्रिकाची ही इच्छा कशी पुर्ण होणार ..... ?
..... दादोपंतांच्या तोडून शब्द फुटत नव्हता. त्यांचा गळा दाटुन आला होता..... पंढरीनाथाला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि रात्रीच्या वेळी ते बाहेरच्या ओवरीत येऊन झोपले.
-आणि त्याच रात्री एक नवल घडले !
स्वप्नात साक्षात पांडुरंगाने दर्शन देऊन एक पेढा त्यांच्या हातावर ठेवला आणि प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, 'वत्सा, दुःख करु नकोस. हा पेढा तुझ्या पत्नीला खावयास दे, म्हणजे तुझी इच्छा पुर्ण होईल.'
त्या विलक्षण स्वप्नामुळे दादोपंत खडबडुन जागे झाले. त्या स्वप्नात्या आठवणीमुळे त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. विलक्षण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांडुरंगाने स्वप्नात दिलेला पेढा प्रत्यक्षच त्यांच्या हातात होता ..... ! !
-ताहराबादेस आल्यावर त्यांनी तो अमूल्य प्रसाद आपल्या पत्नीस खावयास दिला.आणि लवकरच तिला गर्भ राहिला अन् नवमास पूर्ण होताच तिने एका तेजस्वी गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला.
हेच आमचे चरित्रनायक कविवर्य महिपतीबोवा !

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें