सोमवार, 22 नवंबर 2010

श्री संत महिपती महाराज चरित्र – लेखक - ह.भ.प.नानामहाराज वणकुटेकर (पुस्तक परिचय )


 आषाढी एकादशी नंतर श्रावणाचे वे लागतात. पेरण्या झाल्या की शेतकरी वर्गाकडे पुरेसा वेळ मिळतो. हिंदु धर्मात संतांचे विषेश महत्वाचे स्थान आहे. ताहराबाद हे निसर्गरम्य डोंगराच्या कुशीतील एक निवांत गावं आहे. राहुरी तालुक्यातील या गावातील संत चरित्रकार महिपती महाराज यांची विषेश ख्याती आहे. त्यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय',संत लिलामृत, ग्रंथात शब्दबध्द केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विषेश स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळीग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नुतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायात दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन 215 वर्षे झालेली आहेत. अठराव्या शतकात संत चरित्र व विठ्ठल भक्तीच्या वारकरी पंथातील अनेक संतां मध्ये महिपती महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वच विठ्ठल भक्तांच्या तोंडी होते. 1992 साली पंढरपूर येथुन प्रसिध्द होनार्‍या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संत चरित्राची विस्तृत माहिती ओवी बध्द करणारे महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. त्यांच्याच वंशातील वयोवृध्द ज्ञानी किर्तनकार  ह.भ.प.नानामहाराज वनकुटेकर उर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी छोटेखानी 83 पानांचे 'श्री संत महिपती महाराज चरित्र' लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 2 ऑगस्ट 2005 श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान ताहराबाद ता.राहुरी येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. या प्रसंगी राहुरीचे आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार प्रसादराव तनपुरे, रामदास धुमाळ, ट्रस्टचे अध्यक्ष श्री रावसाहेब साबळे तसेच विश्वस्त श्री भाऊसाहेब किनकर हजर होते. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री चंद्रकांत पालवे यांनी या चरित्रा करीता विशेष परीश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे. ह.भ.प. नाना महाराज वनकुटेकरांचे ते शिष्य आहेत. ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहिर खान नावाच्या सरदाराकडे जहागीर होते. त्यांच्या पदरी श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण गावचे कुलकर्णी व ग्राम जोशी पदाचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा वयाच्या साठाव्या वर्षी संत महिपती महाराजांचा जन्म झाला. त्यांची पत्नी गंगाबाई या संसार दक्ष सत्वशील साध्वी स्त्री होत्या. श्री दादोपंत कांबळे हे मुळचे मंगळवेढ्याचे परंतु सासुरवाडीला ताहराबाद येथे स्थायिक झाले. पंढरपुरची पायी वारी त्यानी कधीही चुकवली नाही.
       वारकरी संप्रदायातील संतांचा संग, संत चरित्राचा परिचय यामुळे महिपती महाराजांनी संत चरित्रात्मक अनेक ग्रंथांची निर्मिती केली. यामधे भक्त विजय, संत लिलामृत हे ग्रंथ महाराष्ट्रात प्रसिध्द पावले.
       महाराज विठ्ठल भक्त होते त्यामुळे विठ्ठलाचे वर्णन करताना ते म्हणतात -
       'विठु पंढरीच्या रामा ! जन्मा आलो किर्ति गाया !!
       धन्य देखिली पंढरी ! पाय तुझे विटेवरी !!
       सलगी केली गा संतासी ! सुख वाटले जीवासी !!
       सुखी नाम गाय किर्ति ! दास तुझा महिपती !!
       न लगे मुक्ति न लगे भुक्ति ! मागत नाही धनसंपत्ती !!
       तुझ्या दासांची वर्णीन किर्ति ! हेचि महिपती मागत !!
       कोणी मागितले सायुज्य सदन ! कोणी मागितले वैकुंठ भवन !!
       माझे हेचि इच्छितसे मन ! जे गुण वर्णीन संतांचे !!
                              (भक्तविजय)
या चरित्रामध्ये लेखकाने महिपती महाराज यांचे बालपण,विवाह,तुकोबारायांचा स्वप्नातील दृष्टांत,दिंडी वारीतील महाराजांचे अनुभव कथन केले आहेत. चरित्राचे वर्णन करताना संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानदेव या वारकरी संप्रदायातील संतांचे अनेक दाखले,ओव्या गुंफल्या आहेत. लेखक स्वत: किर्तनकार व प्रवचनकार आहेत त्यामुळे त्यांच्या लेखणीवर संत साहित्याचे संस्कार प्रकर्षाने जाणवतात. महिपती महाराजांच्या काही चमत्कारांचा उल्लेख चरित्रात आढळतो. संतांनी त्यांच्या हयातीत अंधश्रद्धा,भेदाभेद दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांच्या भक्तांनी अत्यंतिक भक्तीभावाने त्यांच्या चमत्कारांचे व दंतकथेचे महात्म वर्णन केले आहे. संतांच्या बद्दल असलेल्या अगाढ श्रद्देमुळे गुणवर्णनात अतिशयोक्ती व चमत्कारांचे वलय निर्माण होत असते. प्रस्तुत चरित्र लिहिताना हा मोह लेखकाला आवरता आलेला नाही जे साहजिक आहे. संत चरित्र लिहण्या मागची महिपती महाराजांची भुमिका व त्यांनी घेतलेले कष्ट यावर अधिक प्रकाश पाडला पाहिजे.
            महिपती महाराजांचे वर्णन करताना पायात ळ, खांद्यावर वीणा, डाव्या हातात चिपळ्या, व पायी घुंगरु असे वर्णन केलेले आहे. तसे त्यांचे जुने चित्र सुध्दा प्रकाशित केले असते तर फारच उत्तम काम झाले असते. वारकरी संप्रदयातील संतांची वेशभुषा व संगीतमय सुमधुर गायन व किर्तनकाराचे चित्र समोर उभे राहते.
      वृद्धत्वामुळे एकादा महाराज पायी वारीत पंढरपुरला जा शकले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांचे शिष्य केशवबुवा व धोंडीभाऊ जवळ पांडुरंग स्त्रोत्र पत्रावर लिहून दिले. हे पत्र त्यांच्या शिष्यांनी पांडुरंग चरणी वाहिले. या स्त्रोत्रात भक्तांसाठी ईश्वराने काय केले पाहिजे याचे रसाळ वर्णन व आर्जव पांडुरंग स्त्रोत्रात केले आहे. महाराजांची भाषा  अत्यंत भावपूर्ण व करुण रसमय आहे. भक्त ईश्वराचे वर्णन करतात परंतु भक्तांसाठी ईश्वराचेही काही देणे लागते ही एक आधुनिक संकल्पना महिपती बुवांनी मांडली आहे.
      ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर यांनी रचलेली श्री सदगुरु महिपती महाराजांची आरती या चरित्रात सामाविष्ठ केलेली आहे.
      महिपती महाराजांच्या समकालीन कविवर्य मोरोपंतांचा उल्लेख यात आढळतो. मोरोपंत यांच्या आर्या मराठी साहित्यात सुप्रसिध्द आहेत. मोरोपंतांनी महिपती महाराजांना बदल त्यंच्या वृतात आदर व्यक्त केलेला आहे. महिपती महाराजां बदल ते लिहितात.
      'श्री रामदास लीला अतुला तुकिता तरी तुकाराम !
      वर्णाया अवतरले द्विज रुपे महिपती तुकाराम
      श्री हरि भक्ति रसाची श्रीहरी भक्तिरस सत्‍सुधा भरिते
      चरिते गाता जेणे आयुष्‍य क्षण पडो दिले न दिले।।
         या चरित्र लिखाणात महाराजांच्‍या जीवनातील घनांचा वेध कालानुरुप झालेला नाही. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील 400 ते 500 संतांचे चरित्र लिहिणार्‍या या अफाट संत चरित्रकारांचे योग्य मुल्य मापन होणे आवश्यक आहे. त्यांची वाणी रसाळ साधी सोपी प्राकृत मराठीत आहे. त्यांच्या साहित्याची तुलना तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्याबरोबर केली जाऊ शकत नाही. परंतु सर्वसामान्य बहुजन वर्गाला भक्ति मार्गाकडे वळविण्यात त्यांना यश आलेले आहे. त्यांच्या संत चरित्रामुळे सात्विक धार्मिक व नैतिक तत्वज्ञानाची बैठक निर्माण होण्यास सहाय्य लाभले आहे. या अगोदर डॉ.रा.चि.ढेरे, वि.वि.राजवाडे, उषाताई देशमुख, वि.ल.भावे, सुरेश जोशी यांनी त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला आहे. संत महिपती महाराजांच्या संत चरित्रावर डॉ.उषाताई देशमुख यांनी कोल्हापुर विद्यापीठात संशोधन केलेले आहे. या संत साहित्याच्या अभ्यासकांच्या विचारांचा समावेश या चरित्रात करता आला असता. नाना महाराज वणकुटेकर हे स्वतः वयोवृद्ध 80 वर्षाचे ग्रहस्थ आहेत. महिपती महाराजांच्या श्रद्धे पोटी व त्यांचे ते पूर्वज असल्यामुळे त्यांनी या वयात सुद्धा हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ही प्रशंसेची गोष्ट आहे.
          महिपती महाराजांनी तीर्थ यात्रेच्या निमिताने भारत भ्रम केलेले आहे. त्यांनी देहु, आळंदी, पंढरपूर, नेवासा, पैठन येथे पायी दिंडीने प्रवास केलेला आहे. त्यांच्या समकालीन संतांचा प्रभाव, सामाजिक परिस्थिति व वारकरी संप्रदायातील त्यावेळची विठ्ठल भक्ति, परंपरा याचा शोध घेता आला असता.
           या चरित्रात नगरचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री वसंतराव विटणकर यांनी महिपती महाराजांच्या जीवनातील तुकाराम आशिर्वाद, ज्ञानदेव दृष्टांत आदि चित्रे खुपच सुंदर रेखाटली आहेत. या चारित्राचे प्रकाशक बाबासाहेब जपे आहेत.  83 पानी पुस्‍तकाची किंमत 50 रुपये असून ती परवडण्‍यासारखी आहे.  या चारित्राचे स्‍वागत वारकरी संप्रदायातील सर्वच विठ्ठल भक्‍तांकडून केले गेले  आहे.  संतचरित्रे लिहिणा-या या महान संताचे चरित्र त्‍यांच्‍याच वंशातील श्री गोविंद म्‍हाळसाकांत कांबळे उर्फ ह.भ.प नानामहाराज
वणकुटेकर यांनी प्रकाशात आणले आहे त्‍यांचे हार्दिक अभिनंदन !    यामुळे महिपती महाराजांच्‍या कार्याची दखल घेतली गेली आहे.  संत महिपती महाराज देवस्‍थान ताहराबाद यांनी  महाराजांची ग्रंथ संपदा प्रकाशित करावी. 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें