संतचरित्रकार संत कवि महीपति तहराबादकर
ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते. ताहराबाद ही त्यांची सासुरवाडी.
दामाजी पंतांच्या मंगळवेढयाहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे स्थायीक झाले.
महिपती यांचे शिक्षण तांभेरे येथील श्री मोरोबा तांभेरकर यांच्या कडे झाले. संस्कृत भाषेचे ज्ञान जुजबी परंतु मराठी भाषेत अवीट गोडी व काव्यप्रतिभा जन्मजात होती.
वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोशी पद सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. एकदा दारी मुस्लिम सरदार आला तेव्हा महाराज विठ्ठल पुजेत मग्न होते.त्यांना आदेश झाला की दफ्तर घेऊन त्वरित हजर व्हावे.महिपती महाराज नाराज झाले,त्यांनी त्या क्षणी कुलकर्णी पद सोडले व आपली लेखनी आयुष्यभर संत चरित्रे लिखाण व विठ्ठल भक्तीत वाहुन घेतले. त्यांनी आपल्या कुळात कोणी ही परकीय गुलामगिरी करणार नाही असे घोषित केले. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.
पुत्र विठ्ठल बुवा पेशवे दरबारी गायक होते व दूसरे पुत्र नारायण कवि मोरोपंत यांचे मित्र होते.
महाराज उत्तर भारतात अनेक क्षेत्रांत तीर्थयात्रा केली होती.ग्वाल्हेर येथे नाभाजी कृत भक्तमाल ग्रंथाचा विशेष प्रभाव होता. भक्तमाल ग्रंथात उत्तर भारतातील अनेक संतांचा परिचय ग्वाल्हेरी भाषेत दिलेला आहे. त्यांनी पुढे भक्तविजय , भक्तलीलामृत व संतविजय ग्रंथा द्वारे अनेक संतांचा परिचय महाराष्ट्राला रसाळ मराठी भाषेत प्रदान केला. त्यांच्या भक्तविजय ग्रंथाचा इंग्रजी भाषेत अनुवाद करताना जस्टीन अब्बोट यांनी निरीक्षण 'स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स' या जगप्रसिद्ध पुस्तकात केला आहे.महिपती यांची भाषा सरळ सोपी जन सामान्यांना भावेल अशी होती. त्यांच्या रचनेत भक्ती,प्रेम,ज्ञान यांचा संगम होता. त्यामुळे अनेक परकीय लेखकांना अनुवाद करणे सोपे झाले होते. महिपती यांनी मराठी भाषेत केलेले काम अत्यंत श्रेष्ठ आहे,कदाचित ते जागतिक पातळीवर अभिजात लेखक गणले गेले असते.
महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.
समाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित 'भक्ती विजय' व 'संतलीला मृत' या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. मराठी भाषेतील रसाळ व काव्यमय चरीत्राची निर्मिती करणारा थोर संत महिपती महाराज यांचा जन्म 1715 रोजी राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे झाला. मुगल काळातील गावाचे कुलकर्णी पद सांभाळताना महाराजांनी दरवर्षी पायी पंढरपुर यात्रा चुकवली नाही. संतांचा संग, तुकारामांचा आशीर्वाद व प्राकृत मराठी भाषेची गोडी या संगमातुन महाराजांनी महाराष्ट्रा बाहेरील 116 व महाराष्ट्रातील 168 संतांची चरित्रे लिहुन प्राचीन मराठीचे भांडार समृद्ध केले आहे.
"संतांची चरित्रे संपूर्ण! एकदाची ना कळती जाण!!
तेव्हा जी झाली आठवण! ती चरित्रे लिहून ठेविली!!"
या ओवीतूनच महाराजांची संत चरित्र शब्द बध्द करण्यामागची भुमिका स्पष्ट होते. तुकाराम महाराजांच्या समकालीन महिपती बुवांना तुकाराम यानांच गुरू मानले होते. संस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वर भक्ती सर्व सामान्यांच्या बोली भाषेत गंगेच्या रुपाने आणण्याचे पवित्र कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. त्यांचेच कार्य पुढे तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या बरोबरीने महिपती बुवांनी चालविले. अठराव्या शतकात ग्रामीण भागातील जनतेत ईश्वर भक्ती जागृत करण्याकरीता संत चरित्र व्याख्यान व काव्य रुपाने साध्या सोप्या रसाळ मराठी भाषेत रचले गेले. संत कथा व्याख्यानात महाराष्ट्र रंगू लागला. दामाजी पंतांच्या मंगळवेढयाहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे स्थायीक झाले. दादोबाच्या याच मुलाने दुष्काळात आपले घर दामाजी पंता प्रमाणे गोर गरीबांकडून लुटवून घेतले. अल्प मिळकतीत आपल्याकडे जे आहे ते गरजुसांठी दान करणे या मागे समाजहिताची फार मोठी व्यापक दृष्टी लागते. संतांची वैशिष्टये हेच सांगतात की 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'
हाच उपक्रम त्यानी पुढील तीन दुष्काळात आरंभिला. वारकरी संप्रदायातील नम्र भाषा प्रभु उदारवादी व पांडुरंग भक्त महिपती महाराज पेशवाईत लोकप्रिय न झाले असते तरच नवल होते.श्रीमंत बाजीराव पेशवे व त्या नंतर मल्हारराव होळकर यांनी महिपती महाराज यांच्या वंशाकरीता जमीन व मान पत्र केल्याची नोंद आहे.
संतसाहित्याचे अभ्यासक श्री.रा.चि.ढेरे म्हणतात "महिपती महाराजांच्या ग्रंथांनी सतत दीडशे दोनशे वर्षे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकमानस सात्विक संस्कारांनी भारुन टाकले होते. काल परवा पर्यत ग्रंथांचीच प्रतिष्ठा सार्वत्रिक होती. हा प्रभाव दुर्लक्षण्याजोगा नाही. संत प्रितीतुन प्रकट झाले आहे. या महान कार्यासाठी महाराष्ट्राने महिपतीचे ऋण प्राजळपणे मान्य करावयास हवे."
दरवर्षी पंढरपुर आळंदी यात्रा करुन महाराजांनी संपूर्ण भारत यात्रा केली होती. उत्तर भारतातील मीरा, कबीर, सुरदास, नरसी मेहता यांच्या बरोबर नामदेव, तुकाराम, रामदास या महाराष्ट्रातील संतांचे चरित्र मोठया मेहनतीने एकत्र करुन मराठीत आणले आहे त्यांच्या या प्राचीन साहित्याचा अभ्यास श्री.वि.वा.राजवाडे, श्री.रा.चि.ढेरे, श्री.भा.ग.सुर्वे, श्री.प्र.रा.भांडारकर, श्री.वि.ल.भावे, सौ.उषाताई देशमुख, श्री.सुरेश जोशी या मान्यवरांनी केला आहे.
संत महिपती महाराज रचित भक्तविजय ग्रंथाचा अनुवाद इंग्रजी भाषेत Saints of Maharashtra, Saints of Pndharapur नावाने जगात प्रसिद्ध पावला आहे. भक्तविजय ग्रंथ दक्षिण भारतात अनुवाद रुपात 'श्री महाभक्त विजयम ' नावाने आज ही तेथील भाविक सश्रद्ध पणे पाठ करीत आहेत.
उत्तर भारतातील संतांच्या कार्याचा परिचय भक्तविजय या ग्रंथाच्या दक्षिणेतील सर्व भाषेत ‘श्री माह भक्तविजम’ नावाने तेथील आम जनतेला झाला आहे.परकीय गुलामगिरीत स्वधर्माचा प्रकाश अखंड तेवत ठेवण्याचे पवित्र राष्ट्रीय कार्य संत महिपती यांच्या संतचरित्र कार्य मुळे शक्य झाले होते.महाराष्ट्रात छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य चळवळीत संत महिपती यांनी मोलाचे कार्य करून युवा शक्ति हिंदवी स्वराज्या साठी उभी केली होती.
"भक्त विजय" ग्रंथात संत जयदेव, तुलसीदास, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, चोखामेळा, कबीर, रोहिदास, नरसी मेहता, रामदास, सेना, मीराबाई, भानुदास, इत्यादी अनेक संतांच्या जीवन कार्य वर आधारित कथा आहेत.
भक्त विजयचे बहुतेक सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. हा कोट्यावधी भाविकांना प्रेरणा देणारा अमूल्य ग्रंथ आहे. तो आजही भारतात अनेक मंदिरात नित्यपाठ व हरिकथा संकीर्तन यासाठी वाचला जातो.
संत महिपती बुवा संत चरित्रकार होते परंतु ते संत चरित्र सुस्वर संगीत ताला वर गायन करीत व भक्तांचा प्रचार करीत. या विषया वर ऑक्सफ़ोर्ड संदर्भ सेवा अंतर्गत इंग्लिश लेख प्रकाशित आहे.
https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100126761केल्याने
देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
संत चरित्र वर्णन करताना संत महीपति यांनी संत कबीर यांच्या रचनांचा अभ्यास केला होता. तत्कालीन हिंदी भाषेला त्यांनी 'हिंदुस्थानी' संबोधले आहे व ती आपली 'देशभाषा' आहे असे वर्णन केले आहे. महाराज बहुभाषी होते,त्यांना मराठी,संस्कृत,हिंदी,कन्नड व इतर भारतीय भाषा यांचा परिचय होता. संत चरित्र लिखाण करण्या आधी भारतातील अनेक तीर्थ क्षेत्र त्यांनी पाया खाली घातले होते. त्यामुळे त्यांच्या चरित्र लिखाण हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक भाषेत पोहचले होते,याचे अनेक संदर्भ साहित्यात उपलब्ध आहेत.
ज्ञान प्राप्ति करीता पर्यटन व भारतीय संस्कृतिचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक भाषा परिवारातील विद्वानांनाचे सान्निध्य आवश्यक असते हे महिपती महाराज यांनी जाणले होते. खरा सच्चा संत हा सर्व भाषेशी मैत्री ठेवतो. वर्तमान काळी सर्वांनी भाषा भेद, जातीभेद वर्ज्य केला तर ज्ञान, भक्ती,विकास होणार हे निश्चित आहे.
संदर्भ-
जे भक्त अवतरले पृथ्वीवरी ॥ तेचि कलियुगामाझारी ॥ प्रकट झाले तारक ॥१६॥ त्यांचीं चरित्रें वर्णावयास ॥ मज वाटला बहु उल्हास ॥ आतां श्रोते हो सावकाश ॥ द्यावें अवधान मजलागीं ॥१७॥ नेणें मी कांहीं चातुर्य व्युत्पत्ती ॥ नव्हें मज बहुश्रुत अध्यात्मग्रंथीं ॥ नेणें संस्कृतवाणी निश्चितीं ॥ श्रीरुक्मिणीपति जाणतसे ॥१८॥ मागें संतवरदानीं ॥ एकनाथ बोलिले रामायणीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥१९॥ नामदेवमुक्तेश्वरांनीं ॥ भारतीं वर्णिला चक्रपाणी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२०॥ श्रीभागवतीं टीका वामनी ॥ हरिविजय केला श्रीधरांनीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२१॥ बोधराज रामदासांनीं ॥ गीतीं आळविला कैवल्यदानी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२२॥ गणेशनाथ केशवस्वामी ॥ साळ्या रसाळ प्रसिद्ध जनीं ॥ कबीर बोलिले हिंदुस्थानी ॥ देशभाषा आपुली ॥२३॥ ऐसे संत प्रेमळ जनीं ॥ ज्यांचे ग्रंथ ऐकतां श्रवणीं ॥ अज्ञानी होती अति ज्ञानी ॥ नवल करणी अद्भुत ॥२४॥
(संत महीपति कृत श्री भक्तिविजय ग्रंथ)
जो भक्तिनाथ बैराग्यपुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।।
तो सदगुरु तुकाराम आम्हांसी जोडला |
स्वप्नी दिधला उपदेश ।।
( भक्तिलीलामृत अध्याय १-२० )
स्वप्नात झालेली तुकारामांची आज्ञा हा ईश्वरी . दृष्टांत आहे , असे समजून महिपतीबुवांनी संतांची चरित्रे लिहिण्यास आरंभ केला .
महाराष्ट्रात सन 1885 ते 1910 काळात 'ज्ञानोदय' या ख्रिश्चन धर्म पत्रिकेचे संपादक रे.जस्टीन एडवर्डस अँबट यांनी महिपती महाराजांच्या 'भक्त विजय' 'भक्त लीलामृत' व 'संत विजय' या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले आहे. महिपती बुवाच्या या संत चरित्रांचा परिचय रे.अँबट यांनी अमेरीकन विद्वानांना करुन दिला. ख्रिश्चन धर्म प्रचारक असुन सुध्दा त्यांनी मराठी संतांचा गाढा अभ्यास केला होता. रे.अँबट यांचे इंग्रजी भाषांतर महाराष्ट्र कवी संत माला (The poet saints of Maharashtra series) या नावांने सुप्रसिद्ध आहे. 'भक्त विजय' ग्रंथाचा अनुवाद करताना त्यांनी डिक्टाफोनचा वापर केला होता. या डिक्टाफोनवर शब्द बद्ध केलेले त्यांचे भाषांतर नंतर कागदावर उतरवले गेले. शनिशिंगणापुराचे नाव भारतात सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. महिपती महाराजांनी 'शनी महात्म्य' ग्रंथाची निर्मिती केलेली आहे.
भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे. ‘श्री भक्तीविजय’ असे ग्रंथाचे नाव असून ,महिपती महाराजांचे वंशज पांडुरंग कांबळे यांनी तो देवस्थान ट्रस्टकडे दिलेला आहे. १७६२मध्ये महाराजांनी लिहिलेल्या श्री भक्तीविजय ग्रंथामध्ये ५७ अध्याय असून, ९९१६ ओव्यांचा समावेश आहे़ बाजरीचे दाणे जाळून त्यापासून तयार केलेल्या शाईच्या साहाय्याने वळणदार अक्षरात ग्रंथनिर्मिती केली असल्याची माहिती संस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे यांनी दिली़ पांडुरंगाची मूर्ती समोर ठेवून महिपती महाराजांनी १५ ग्रंथांची निर्मिती केली. महाराजांचे एकमेव हस्तलिखित ग्रंथ असल्याने त्याचे जतन करण्यात येणार असल्याचे संस्थान ने स्पष्ट केले आहे.
मराठी साहित्याचा प्रवाह संत चरित्रातून त्यानी प्रवाहित केला. त्याच महिपतीच्या जन्मगावी आज मोठे प्रशस्त भव्य मंदिर उभे आहे. संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रावसाहेब साबळे पाटील दरवर्षी निष्ठेने ताहराबाद ते पंढरपुर पायी पालखी काढतात. या पालखीमध्ये राहुरी, श्रीरामपुर, संगमनेर, पारनेर, व अहमदनगर येथील हजारो विठ्ठल भक्त सामिल होतात. या ट्रस्टमधे महिपती महाराजांच्या वंशातील श्री.अविनाश मुरलीधर कांबळे, ह.भ.प.पांडुरंग जनार्धन कांबळे व श्री.संजय तुकाराम कांबळे यांचा समावेश आहे.
महिपती महाराजांचे अनेक ग्रंथ अद्याप अप्रकाशित आहेत. काही हस्तलिखिते महाराजांच्या वंशजांकडे भक्तिभावाने सांभाळून ठेवली आहेत. महिपती यांचे हस्ताक्षर सुंन्दर आहे. महाराजांच्या अनेक पोथ्या पुणे, मुंबई येथील संशोधकानी हस्तगत केल्या आहेत. कांबळे घराण्यातील बहुतेक कुटुंबे पोटा पाण्यासाठी व्यवसायानिमित महाराष्ट्रात, कर्नाटकात व मध्य प्रदेशात पांगले आहेत.
श्रीक्षेत्र ताहराबाद येथील उत्सव आषाढ शुध्द १० पासुन अमावस्ये पर्यंत असतो. त्रेयोदशीला काला, चतुर्दशीस तळीत पहाटे पाऊलघडीची पुजा झाली की उत्सव संपतो. पाऊलघडी म्हणजे महिपती महाराजांच्या पाऊलांचे लाल ठसे धवल वस्त्रावर प्रकटतात अशी ग्रामस्थांची श्रद्दा आहे. या श्रद्देला आधार काय असु शकतो याचा विचार केला की वाटते महिपती बुवांनी पंढरीची पायवारी कधी चुकवली नाही. विठ्ठालाच्या दर्शनाला जाताना महाराजांच्या पायात काटे रुतत असावेत व रक्ताळलेल्या पावलांनी ती वारी संपन्न होत असावी. त्याचीच आठवण येथील सश्रद्द भाविक पाऊलघडी कार्यक्रमा द्वारे व्यक्त करीत असावेत.
मी एका उत्सवाला गेलो होतो. तेथील ग्रामस्थांनी रचलेले सोंगे पाहुन चकित झालो. दिवसभर शेतात राबणारे अडाणी शेतकरी सोंगे आणताना असा काही अभिनय करतात की राजस्थानी राजपुताचे घोड्यावर स्वार होत केलेले सोंग मी कोणत्याच नाटकात, चित्रपटात पाहिलेले नाही. महिपती बुवांना मराठी भाषे व्यतिरीक्त गुजराती, हिंदी व कानडी भाषा अवगत होती. संपूर्ण भारत भ्रमंतीतुन त्यांनी त्याकाळी विविध भागातील लोक कलेचा संस्कार आपल्या ताहराबादला आणला होता.
या उत्सवात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनाकार एकत्र जमतात. नासिक येथील ह.भ.प. बावीकर यांच्या किर्तनाने भारावुन मी बाल सुलभ प्रश्न केला होता की "आपल्या हिंदु धर्मात केसरी रंगाला विशेष महत्व आहे तसे मुस्लीम धर्मात हिरव्या रंगाला महत्व का आहे ?" माझ्या प्रश्नावर गंभीर चिंतन करताना ते म्हणाले की " बाळ, रंगांचे महत्व आपल्या संस्कृतीत भौगोलिक कारणाने प्राप्त झालेले आहे. हे बघ, मुस्लीम धर्माचा प्रथम प्रसार अरबस्थानातील वाळवंटात झाला. ते ओयासीसला अर्थात हिरवळीला फार पवित्र मानतात. त्यामुळे हिरवा रंग त्यांना शुभ वाटतो. हिरवा रंग हिंदु धर्मात संपन्नतेचा दर्शक आहे. आपल्या बायका शुभ प्रसंगी हिरवा चुडा परीधान करतात. आपण सुर्याला मानतो त्यामुळे उगवत्या सुर्याचा केसरी रंग आपल्याला शुभ वाटतो.!"
वारकरी संप्रदयालील संतांचे उदार धोरण व हिंदु धर्मातील कर्मकांडाला त्यांनी केलेला तीव्र विरोध प्रकर्षाने भावतो.नाम स्मरण व सदाचार हिच ईश्वर सेवा ते मानतात. सुख सुविधे मुळे आज आपण बंगला, गाडी, पैसा, नोकरी, व्यवसाय,सत्ता, राजकारण यालाच देव मानु लागलो आहोत.कदाचित तुम्ही नास्तिक असाल परंतु मानवता, बंधुता व प्रेम या मानवी मुल्यांच्या मुर्तीचा विध्वंस करुन स्वत:चे मोठेपण सिध्द करु शकणार नाहीत.संतांचे हे मोठेपण आपण कधीच खुजे करु शकणार नाही. भारतीय संस्कृतीचे मुल्य अबाधित ठेवण्यात संतांचा फार मोठा वाटा आहे हे विसरुन चालणार नाही. अशा सर्व संतांचा परिचय आपल्याला करुन देणारे संत चरित्रकार महिपती बुवांचे उपकार कोणालाच विसरता येणार नाहीत. ताहराबाद येथील संत महिपती देवस्थान ट्रस्टचा कारभार वाढला आहे. दरवर्षी ताहराबाद येथुन पंढरपुरला भव्य पालखी व पायी वारी निघते. याचे सुंदर नियोजन होत आहे. ट्रस्टने महाराजांच्या साहित्य संपदेचे मुद्रण करुन सर्व मराठी भाविकांना अल्प किंमतीत उपलब्ध करुन द्यावे. मराठी भक्ती साहित्याचे हे भांडार आता तरी खुले केले पाहिजे. ताहराबाद येथील देवस्थानात त्यांच्या जीवन चरित्रावर आधारीत चित्रमय गँलरी उभी राहावी व तेथे एका दुर्लक्षीत संत महिपती बुवांचे गांव हे धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे हीच सदिच्छा व संत महिपती बुवांच्या चरणी शतश: वंदन.
~ विजय प्रभाकर नगरकर
अहमदनगर
9422726400
(ताहराबादकर)